'हाथी घोडा पालखी... जय कन्हैया लाल की...'

Foto
जन्माष्टमीच्या उत्साहाने दुमदुमले शहर
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की...
च्या जयघोषाने शहरात जन्माष्टमीचा उत्साह शिगेला पोहोचला. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा सोहळा शहरातील विविध कृष्ण मंदिरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
मंदिरांमध्ये करण्यात आलेली आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई, श्रीकृष्णाच्या बालरूपातील देखावे आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. सकाळपासूनच भाविकांनी मंदिरांकडे दर्शनासाठी गर्दी केली. तर रात्री बाराच्या सुमारास श्रीकृष्ण जन्मोत्सवासाठी मंदिरांमध्ये मोठी गर्दी झाली. जन्माष्टमीनिमित्त शहरातील पैठण रोड येथील श्रीकृष्ण मंदिर, अदालत रोड परिसरातील कृष्ण मंदिर, एन-१ सिडको येथील कृष्ण मंदिर यासह विविध भागांतील मंदिरांमध्ये विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रंगीबेरंगी फुलांनी मंदिरांचा गाभारा आणि प्रवेशद्वार सजविण्यात आले होते. श्रीकृष्णाच्या बालरूपाची आकर्षक सजावट करण्यात आल्याने भाविकांचे लक्ष वेधले जात होते.
शहरातील विविध मंदिरात कृष्ण जन्मोत्सव उत्साहात
धार्मिक कार्यक्रम
जन्माष्टमीनिमित्त मंदिरांमध्ये पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजा-अर्चा, आरती, भजन, कीर्तन आणि नामस्मरणाचे कार्यक्रम झाले. अनेक भाविकांनी कुटुंबासह मंदिरात येऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. दिवसभर मंदिरांमध्ये गोविंदा गोपाळा, जय श्रीकृष्णच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले. काही मंदिरांमध्ये श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रकाश टाकला. बालकृष्णाचा जन्म, गोकुळातील बाललीला, यशोदा-कृष्ण, राधा-कृष्ण यांसह विविध प्रसंगांची सजावट करण्यात आली होती. लहान मुलांनी कृष्ण आणि राधेच्या वेशभूषेत सहभागी होत उत्सवाची शोभा वाढविली.
मध्यरात्री जन्मोत्सवाचा जल्लोष
कृष्ण जन्माष्टमीचा मुख्य सोहळा मध्यरात्री पार पडला. रात्री मंदिरांमध्ये जल्लोष करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माची घोषणा होताच भाविकांनी जयघोष करत आनंद व्यक्त केला. काही ठिकाणी पाळण्यात ठेवलेल्या बालकृष्णाची आरती करण्यात आली. फुलांची उधळण करून आणि प्रसादाचे वाटप करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की.. या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. अनेक भाविकांनी मध्यरात्रीपर्यंत मंदिरात थांबून जन्मोत्सवाचा सोहळा अनुभवला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions